माझ्या सख्यांवो,
“माझे आरोग्य माझी जबाबदारी”
या उक्तीने राहिलात तर आयुष्य खूप आनंदाने जगता येईल तुम्हाला.मला आलेले अनुभव मी एवढ्याच साठी शेअर करतीये की
आरोग्य आणि मानसिकता याची गफलत केलीत तर ब-याच वेळा काही गोष्टींना (नको त्या)सामोरे जावे लागते.त्या पेक्षा,
“पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में”
म्हणत आयुष्य जगा.
माझ्या डॉकटरीच्या व्यवसायामुळे सतत विविध स्वभावाची माणसे रोज भेटत राहतात.
काही अनुभव, काही प्रसंग कितीही जुने झाले तरी कायम आठवणीत राहतील असे आहेत.
माझा गायनॉकॉलॉजीतला आतापर्यंतचा प्रवास….
ह्या प्रवासातली सुरवातीची धडपड आहे, अनुभव आहेत.
खरा प्रवास बारावीनंतर medical college मधेच सुरू झाला.
परीक्षा सहसा चांगल्या जायच्या. कारण खूप अभ्यास करायची सवय होती, आई वडिलांच्या धाक होता व स्मरणशक्तीही बऱ्यापैकी होती.
मेडिकलला फार हुशारी लागत नाही (ती हुशार मुलं इंजिनिअरिंगला जातात)
फक्त पाठांतर आणि कष्टाळूपणा लागतो.
MBBS नंतर मी गायनॉकच करायचे ठरवले.
जशी रेसिडेन्सी सुरू झाली, तशे रोज वेगवेगळे अनुभव आले.
मी ज्या हॉस्पिटलमध्ये तीन वर्षे रेसिडेन्सी केली तिथे जसळपास च्या खेड्यापाड्यातून खूप patients यायचे.
खूप वेगवेगळे अनुभव आले.
होस्टेलवर राहत असल्यामुळे कुठलीही “interesting case” अली, की तडक आम्ही सगळे गोळा होयचो.
Opd मध्ये सुद्धा अगदी वेगवेगळे अनुभव यायचे.
एकदा एक लहानमुलीला तिच्या वडिलांनी तपासायला आणले होते, तिचे नाव मी विचारले.
उत्तर मिळाले “नकोशी”.
आधी क्षणभर माझा विश्वासच बसेना.
मग कळले, हिच्या आधी दोन मुली आहेत, म्हणून हिचे नाव ठेवले “नकोशी”
एकदा कॉल वर असताना रात्री एक 19/20 वर्षची पाहिलटकरीण labour room मध्ये आली.
तिच्या आईनं सांगितले, नववा महिना लागलाय, कळा चालू झाल्यात.
मी तिला तपासल्यावर मला काही कळेना. पोटाला हात लावून बाळाचे अवयव काही समजेनात.बाळाचे ठोके पण स्टेटोस्कॉपेने ऐकू येईनात.(त्यावेळी खेड्यापाड्यातून येणाऱ्या बायका… पूर्ण गरोदरपणात एकही सोनोग्राफी केली नाही ,असे होत असे).
त्या मुलीला एकदाही डॉक्टर कडे नेले न्हवते, पाळी थांबलीये, पोट वाढत चाललंय, म्हणजे दिवस राहिलेत, असे समजून, सहाव्या – सातव्या महिन्यात घरच्याघरी डोहाळजेवण वगैरे उरकून सगळे आनंदात होते.
मी माझ्या सिनियर रेसिडेंट ला बोलवून सर्व सांगितले. तिलाही काही पत्ता लागेना.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिची सोनोग्राफी केली.
त्यात कळाले तिला भला मोठा ovarian tumour आहे. लगेच surgery प्लान केली,परंतु दुर्दैवाने तो कॅन्सर निघाला, आणि नंतर chemotherapy देऊन सुद्धा ती वाचू शकली नाही.
असं काही झालं की मन खिंन्न होतं, वाटतं, किती casually घेतात काही लोक, अश्या निष्काळजीपणा पोटी हाकनाक जीव गमवावा लागला त्या तरुण मुलीला.
ह्या उलट काही गंमतीशीर प्रसंग…..
एका प्रसूतीनंतर जन्माला आलेल्या बाळाच्या बोटाला चक्क copper T चा दोरा गुंडाळला होता
जणू काही तो आपल्या सर्वांना सांगू इच्छितो
“गर्भनिरोधकाचा जाहीर निषेध”
तर अशा या म्हणायला गंमती जंमती, पण अनुभवाचे शहाणपण देऊन गेल्या…..अजूनही देतात……
क्रमशः……
अजून भरपूर अनुभव गाठीशी आहेत
ते पुढच्या भागात….
तोपर्यंत… काळजी घ्या!
Dr Shalaka Shintre Shimpi .
M.D.(Obgyn)